फडके विद्यालयातील वीस डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन

फडके विद्यालयातील वीस डिजिटल क्लासरूमचे उद्धाटन

म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील ‘ई-लर्निंग डिजिटल क्लासरूम’ चे व्हर्च्युअल उद्घाटन ज्युपिटर डायकेमचे संचालक मा. श्री. सी. चेलप्पन यांच्या शुभहस्ते शनिवार, दि .२४ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.सुबोध भिडे, भारत विकास परिषदेचे पनवेलचे अध्यक्ष मा. श्री. गिरिष समुद्र तसेच शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. विजय भालेराव, शाळा समितीचे महामात्र मा. श्री. अतुल कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमास शाळेचे हितचिंतक व स्नेही उपस्थित होते.

ज्युपिटर डायकेमचे व्यवस्थापकीय भागीदार मा. श्री. रमेश चोखानी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून (सीएसआर) केलेल्या सहकार्यामुळे विद्यालयातील वीस वर्ग खोल्या ‘डिजिटल क्लासरूम’ म्हणून सज्ज झाल्या असून ‘डिजिटल स्कूल’चे स्वप्न साकार झाले आहे.

सर्व वर्गखोल्या डिजिटल असणारी पनवेल परिसरातील मराठी माध्यमाची ही एकमेव डिजिटल हायटेक शाळा ठरली आहे. विद्यालयातील इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

यावेळी विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी पहिला डेमो लेसन घेतला. तसेच विद्यालयाच्या e – संवाद व e-reflection या डिजिटल पाक्षिकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मा. विजय भालेराव यांनी मान्यवरांचे आभार मानले तसेच या ई – क्लासरूमचा उपयोग हा पुस्तकांच्या पलिकडील ज्ञान आत्मसात करण्यासाठी होईल याची ग्वाही दिली.

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.निशा देवरे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी वैशंपायन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहाय्यक शिक्षिका सौ. स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयातील लिपिक सौ. उमा इनामदार यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण You tube व Facebook च्या माध्यमातून करण्यात आले.

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’