*साहित्यातील नऊ रस आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न फडके विद्यालय करीत आहे.*
पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘रसरंग’च्या प्रमुख पाहुण्या व ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती सुनीता जोशी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या. उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी व्यासपीठावरून संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्याचे कार्य फडके विद्यालय नेहमीच करीत असते. पनवेल परिसरात विद्यालयाने आपले वेगळेपण जपले आहे. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा उत्तम प्रयत्न दिसून आला.”
याप्रसंगी व्यासपीठावर फडके विद्यालयाच्या शाला समितीचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापिका समिता सोमण, मनिषा महाजन, निशा देवरे, शितल साळुंखे, नमिता जोशी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सुधीर गाडे यांनी आपल्या ओघवत्या भाषेत उपस्थितांना प्रज्ञायुक्त शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले,” चाकोरीबद्ध दिशाहीन शिक्षण उपयोगाचे नाही. स्वतः ला आनंद देणारे व राष्ट्रहित जपणारे शिक्षण येत्या काळात महत्वाची भूमिका बजावणार आहे.” फडके विद्यालय पनवेल परिसरातील शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक विभागाच्या बालदोस्तांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ” महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या द्रष्ट्या ध्येयधोरणांमुळे विद्यालयाची २६ वर्षांची वाटचाल ही राष्ट्रहिताच्या निश्चित ध्येयाला साध्य करण्यासाठी सुरू आहे. विद्यार्थी विकास हाच आमचा ध्यास आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शाळेच्या कार्याचा पाया आहे.” प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती बापट यांनी केले.