नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,नवीन पनवेल प्राथमिक विभाग – मराठी माध्यमातील इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ‘पर्यावरण पूरक किल्ला बनविणे’ स्पर्धेचे आयोजन तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पहाट या कार्यक्रमांतर्गत ‘सूर छोट्यांचे निमित्त दिवाळी सणाचे’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक २५/ १०/ २०२४ रोजी विद्यालयाच्या सभागृहात केले होते. सर्वात प्रथम विद्यार्थी व पालकांनी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण करण्यात आले. सदर स्पर्धेत एकूण १९ किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या होत्या
त्यामध्ये सिंधुदुर्ग, प्रतापगड, रायगड, शिवनेरी, जिंजीचा किल्ला इत्यादी अनेक किल्ल्यांच्या सुंदर अशा प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. सर्व किल्ले पर्यावरण पूरक असे बनविण्यात आले होते. कागदाचा लगदा, पुठ्ठा, माती,दगड इत्यादी वस्तूंचा वापर करून किल्ले तयार केले होते. विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, आपल्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करावे तसेच आपला इतिहास त्यांना समजावा हाच यामागचा उद्देश. किल्ल्यांचे परीक्षण ऋषिकेश महाविद्यालय नवीन पनवेल चे कलाशिक्षक श्री. मंगेश धर्माजी शेवते व श्री. मंदार खडतरे यांनी केले. किल्ल्यांचे परीक्षण झाल्यानंतर प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे मॅडमनी श्री मंगेश शेवते सर व श्री मंदार खडतर सर यांच्या हस्ते देवी शारदा व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे मॅडम यांनी पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सर्व पर्यावरण पूरक किल्ले बघून परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण व कौशल्याचे खूप खूप कौतुक केले. किल्ले बांधणे स्पर्धेचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांडपिळे मॅडमनी केले. यानंतर दिवाळी पहाट या कार्यक्रमांतर्गत ‘सूर छोट्यांचे निमित्त दिवाळी सणाचे’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कलेचे प्रकार सादर केले.
विद्यार्थी,शिक्षक आणि पालक दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी गायलेली गाणी आणि पारंपारिक दिवाळी चे गीत मनाला अल्हाददायक होते.
सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांनी या सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घेतला.
दिवाळी पहाटचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन केलेली दीपमाळ सजावट.
या उत्सवात विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला
अशाप्रकारे आनंदमय वातावरणात किल्ले बांधणे स्पर्धा आणि दिवाळी पहाट हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरले.
https://photos.app.goo.gl/eC4f1PtztJTkGJxu8