फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची यशस्वी सांगता
*पनवेल* दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी म. ए.सो च्या आदयक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त एका विशेष समारंभ आयोजन केले होते.
या समारंभाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल मधील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा. श्री गिरीश समुद्र, म.ए.सो. नियामक मंडळाचे अध्यक्ष. श्री. बाबासाहेब शिंदे, शालासमिती अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर, महामात्र श्री. सुधीर गाडे तसेच म. ए. सो. पुणे येथील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होते.
समारंभात पनवेल नजीकच्या चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील मुलांकरीता विद्यार्थ्यांनी जमा केलेले १२०० किलो तांदूळ भेट म्हणून सुपूर्त करण्यात आले. आश्रमाचे श्री.शिंदे यांनी या भेटीचा स्वीकार केला. रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
रौप्य महोत्सवी वर्षाचा टप्पा पूर्ण करणे हे आव्हानात्मक आहे, परंतु फडके विद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक धोरणानुसार ते शक्य झाले असून त्याबद्दल तसेच भविष्यातील उपक्रमाबद्दल विद्यालयास शुभेच्छा देत प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मा. बाबासाहेब शिंदे म्हणाले “सुरुवातीच्या काळातील विविध संघर्षातून पुढे जात विद्यालयाने पंचवीस वर्षे पूर्ण करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. समाजामध्ये शाळेची चांगली प्रतिमा तयार होत आहे. तसेच आधुनिक मुंबई-नवी मुंबई शहर बनताना भविष्यातील फडके विद्यालायचा प्रभाव कसा टिकवता येईल याकडे अधिक लक्ष द्यावे” असे आवाहन केले. यासोबतच विद्यालयाने केलेल्या निधी संकलनाबद्दल मान्यवरांनी शाबासकी दिली.
विद्यालयातील शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी आपल्या सहज सुंदर शैलीत या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विद्यालयावर रचलेल्या कवितेच्या गायनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेष बाब म्हणजे विद्यालयाच्या २५ वर्षप्रवासाच्या इतिहास स्मरणीकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या या सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली आणि विद्यालयाच्या सामाजिक जबाबदारीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयातील शिक्षकांनी रचलेल्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.