म. ए. सो. कलावर्धिनी आयोजित रंगवेध चित्र प्रदर्शन व स्पर्धा

*कलेचा वापर समाजबांधणीसाठी व्हावा*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये बुधवार, दि.२४ जानेवारी रोजी म ए सो कलावर्धिनी आयोजित तिसऱ्या ‘रंगवेध’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव बोलत होते.
रंगवेध च्या उद्घाटन सोहळ्यात ते पुढे म्हणाले, ” सध्या एआय च्या काळातही कलाकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कलावर्धिनीच्या माध्यमातून कलांना प्रोत्साहन देण्यासाठी रंगवेध सारख्या प्रदर्शनाद्वारे कौतुकास्पद कार्य करत आहे. शाळांनी कलेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.” फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन कलाक्षेत्रातील संधींबाबत त्यांनी प्रश्नोत्तरांतून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या खुमासदार शैलीत प्रात्यक्षिकातून सुलेखनाची पद्धत समजावून सांगितली.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात म ए सोच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा व म ए सो कलावर्धिनीच्या अध्यक्ष आनंदी पाटील यांनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रंगवेध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते, याबाबत अधिक माहिती सांगताना त्या पुढे म्हणाल्या, ” महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून संस्थेने कालगती ओळखून आपली कार्यसंस्कृती जपली आहे. मानवी जीवनातील कलेचे स्थान हे आदीकाळापासून अधोरेखित होते आहे. भावी पिढीच्या मनात कलाप्रेम जोपासण्याचे हे प्रयत्न येत्या काही वर्षांमध्ये नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास वाटतो.”
याप्रसंगी व्यासपीठावर म ए सोच्या आजीव सभासद मंडळाचे सदस्य, म ए सो कलावर्धिनीचे महामात्र व फडके विद्यालयाच्या शालासमिती चे सदस्य डॉ गोविंद कुलकर्णी, म ए सो च्या नियामक मंडळाचे माजी सदस्य विनायक शुक्ल तसेच माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे, प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी आदी मान्यवर विद्यार्थी, शिक्षक पालक उपस्थित होते. म ए सो च्या नियामक मंडळाचे माजी सदस्य विनायक शुक्ल यांनी चित्रांचे मनावर होणारा जादूई परिणाम एक प्रेरक प्रसंगातून उपस्थितांना सांगितला.
आपल्या प्रास्ताविकातून म ए सो कलावर्धिनीचे महामात्र डॉ गोविंद कुलकर्णी सरांनी रंगवेध प्रदर्शनामागील भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले,” कला या जगण्याचे भान देतात. कलांच्या जतन व संवर्धनाचे काम कलावर्धिनीच्या माध्यमातून होत आहे.रंगवेध हा महाराष्ट्रच्या कला चळवळीतील म ए सो ने घालून दिलेला आदर्श वास्तूपाठ ठरेल.”
प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यसिद्धीसाठी विद्यालयातील संगीत शिक्षिका वर्षा सहस्रबुद्धे यांच्या सुरेल आवाजातील संकल्प श्लोकांच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील सहाय्यक शिक्षिका, प्रीती धोपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/mRWfzV68ryqpZ4eg9◊

Leave a Comment

This will close in 20 seconds