आपण सर्वजण गेले वर्षभर कोविड -१९ या संकटाचा सामना करत आहोत. या संकटात अनेकांनी आपले कर्तव्य चोख बजावले आहे, परंतु या सर्व संघर्षात स्त्री शक्तीचे योगदान नक्कीच अतुलनीय आहे. या कालावधीत निर्भयपणे अनेक महिलांनी आपले कर्तव्य बजावत स्वहितापलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी अत्यंत धैर्याने पूर्ण केली आहे. आर्थिक संकट आल्यावर कुटुंबासाठी छोटेखानी व्यवसाय सुरू करून इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला अशा लघु उद्योजिका, डॉक्टर, परिचारिका, संस्कारवर्ग संचालिका, गीता प्रचारक, रिक्षा चालक, अनाथ आश्रमाच्या संचालिका, सरपंच अशा एकूण १२ शक्तीदुर्गांचा शाळेच्या माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.समिता सोमण यांच्या हस्ते शेला, कौतुकपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सोमवार, दिनांक ८ मार्च २०२१ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी सन्मानित महिला सौ.करंदीकर, सौ. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी केले. “आपला सन्मान हा प्रातिनिधिक स्वरूपात सर्व महिला शक्तीचा आहे, आपले कार्य हे अतुलनीय आहे व हे कार्य आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मांडले.
या प्रसंगी प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नमिता जोशी यादेखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या साहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रीती धोपाटे यांनी केले तर विद्यालयाच्या साहाय्यक शिक्षिका सौ. बापट यांनी आभार मानले.