विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन व्याख्यान :
एसएससी बोर्ड परीक्षा रद्द तर पुढे काय?
म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात दिनांक १९ मे रोजी इयत्ता दहावीचे विद्यार्थी व पालकांसाठी ‘एसएससी बोर्ड परीक्षा रद्द, तर पुढे काय?’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी वैशंपायन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला.
म.ए.सो. व्यक्तिमत्व केंद्राच्या मुख्य समन्वयक गिरीजा लिखिते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा होय. विद्यार्थ्यांना करिअरच्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा आलेख असे हे वर्ष असताना मार्च २०२० पासून कोविड-१९ च्या जागतिक महामारीचे संकट ओढावले. अशा परिस्थितीत शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रथमच बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतू, विद्यार्थ्यांनी वर्षभर प्राप्त केलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा त्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल याबद्दल गिरीजा लिखिते यांनी पालकांना आश्वस्त केले. विद्यार्थ्यांनी खचून न जाता लॉकडाऊनमध्ये फावल्या वेळेचा सदुपयोग करावा. आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यास मदत होईल अशा नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात. नवीन भाषा शिकावी, एखादा छंद जोपासावा, गॅझेट्स-इंटरनेटचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करावा असे त्यांनी सांगितले.
समुपदेशक सुरेख नंदे मॅडम यांनी CET व इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आपण सज्ज राहिले पाहिजे असा विश्वास मुलांना व पालकांना दिला तर, विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न बनता विद्यार्थी बनावे; स्वतःची आवड, क्षमता लक्षात घेऊन करिअरबाबत स्व-विकसन व कौशल्यांवर आधारित किंवा कलचाचणीद्वारे क्षेत्र निवडावे असा सल्ला समुपदेशक शुभा कुलकर्णी यांनी दिला. स्मिता लोकरे यांच्या उद्बोधनपर गोष्टीद्वारे सत्राचा समारोप झाला.
विद्यालयाचे पालक विनायक पात्रुडकर यांच्या कल्पनेतून या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सकारात्मक मार्गदर्शनाने पालक व विद्यार्थी यांच्या मनात नक्कीच आत्मविश्वास निर्माण झाला असणार याची खात्री वाटते.
या व्याख्यानास इयत्ता दहावीचे ६५ विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले.