आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी
दिनांक: १७ फेब्रुवारी २०२६
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जोपासना करणे आणि क्रांतीकारकांच्या बलिदानाची स्मृती जागवणे या उद्दिष्टपूर्तीसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांच्या हस्ते वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी क्रांतीकारकांचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली लोंढे मॅडम यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कांडपिळे मॅडम यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनकार्याची माहिती देताना एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट नमूद केली की, “आपण ज्या शाळेत शिक्षण घेत आहोत, तिची स्थापना वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, व इंदापूरकर यांनी केली आहे आणि त्यांच्याच नावाच्या शाळेत शिकण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे.” हे ऐकून सर्व विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला व सर्वांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचा देदिप्यमान इतिहास समजला. राष्ट्रहित जोपासण्याची प्रेरणा घेऊन आणि “स्वराज्य” हाच ध्यास मनी बाळगून विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांना मानवंदना दिली.











