वाचन प्रेरणा दिन
दिनांक: १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणे आमच्या विद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे आणि ज्ञानसंपन्न समाज निर्माण करणे हे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. देवरे मॅडम यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व अत्यंत सुंदर शब्दांत समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की वाचनामुळे विचारांना दिशा मिळते आणि प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने भरलेला नागरिक बनतो.
यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले. काही विद्यार्थ्यांनी आपले आवडते गोष्टीचे भाग मोठ्याने वाचून दाखवले. शाळेच्या सभागृहात आनंददायी वाचनाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी “दररोज थोडं वाचायचं” हा नवा संकल्प केला.
कार्यक्रमाची सांगता “वाचन हीच खरी प्रेरणा!” या घोषवाक्याने झाली.







