पर्यावरणपूरक किल्ले बांधणी स्पर्धा आणि दीपोत्सव सोहळा
दिनांक: ६ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यालय सभागृहात पर्यावरणपूरक किल्ले बांधणी स्पर्धा आणि दीपोत्सव सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या आयोजनामागे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर याविषयी आदर्श निर्माण करणे तसेच ‘गीत रामायण’ व रामस्तुतीद्वारे भारतीय संस्कृती आणि साहित्याच्या मूल्यांची ओळख करून देणे हा उद्देश होता.
सकाळच्या सत्रात, विद्यार्थ्यांनी घरातून पर्यावरणपूरक किल्ले बनवून आणले. ज्येष्ठ शिक्षिका डोके मॅडम यांनी किल्ल्यांमधील कल्पकता आणि ऐतिहासिक तपशील पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दीपोत्सव सोहळ्यासाठी सभागृह दिव्यांच्या रोषणाईने मंगलमय करण्यात आले. माध्यमिक विभागाच्या सोमन मॅडम आणि प्राथमिक विभागाच्या देवरे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती व शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले. विद्यार्थ्यांच्या शिवगर्जना आणि पोवाड्याने शौर्याचा इतिहास जिवंत झाला. मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर शिक्षकवृंदाने राम स्तुती चे गायन केले आणि विद्यार्थ्यांनी ‘गीत रामायणा’वर आधारित सादरीकरण केले, ज्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाच्या उत्कृष्ट आयोजनाचे भरभरून कौतुक केले. डोके मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. हा सोहळा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वयातून संस्कृती आणि शौर्य परंपरेची जाणीव करून देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.












