“मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे.”
शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी, पनवेल येथील फडके नाट्यगृहामध्ये,
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,पुणे संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या २७ वे वार्षिक स्नेहसंमेलन “ठेवा संस्कृतीचा” उत्साहात साजरे झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. उल्का धुरी(CSR कन्सल्टंट) उपस्थितांशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्रची संस्कृती , लोककला आणि परंपरेचा वारसा नृत्यातून प्रदर्शित केला तो सर्वोत्कृष्ट होताच, पण विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीची जाणीवजागृती व अभिमान निर्माण करण्याचे कार्य फडके विद्यालय नेहमीच करीत असते.पनवेल परिसरात विद्यालयाने आपले वेगळेपण जपले आहे.
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिलेला मंच व प्रोत्साहन खरोखरच प्रशंसनीय आहे. विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी लागणारी सर्व मदत मी करायला तयार आहे.” विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका समिता सोमण, मनिषा महाजन, नमिता जोशी या उपस्थित होत्या .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा, गोंधळ, भारूड , जोगवा, पोवाडा, कोळी परंपरा, धनगर नृत्य, शेतकरी नृत्य, मंगळागौरीचे खेळ इ. विविध नृत्यप्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ” महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या द्रष्ट्या ध्येयधोरणांमुळे विद्यालयाची २७ वर्षांची वाटचाल ही राष्ट्रहिताच्या निश्चित ध्येयाला साध्य करण्यासाठी सुरू आहे.
याकरिता “ठेवा संस्कृतीचा “यासारख्या विषयाची निवड करून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृती विषयी अभिमान जागृत करण्याचे कार्य विद्यालय करत आहे. विद्यार्थी विकास हाच आमचा ध्यास आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा शाळेच्या कार्याचा पाया आहे.” असे बोलून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व सांस्कृतिक प्रमुख सुनिता वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती धोपाटे यांनी केले.


















