स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान

म. ए .सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल
(मराठी माध्यम माध्यमिक विभाग)
*”स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला तेजस्वी, तत्पर तरूण आज शाळाशाळांमधून घडणार आहे.”*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात विवेकानंद केंद्र बदलापूर च्या शाखाप्रमुख मा. मीना देशपांडे याठिकाणी बोलत होत्या.
राष्ट्रीय युवा चेतना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मीनाताई यांनी आपल्या ओघवत्या, सहजसुंदर भाषेत स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग व कथांमधून स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले. त्या म्हणाल्या,” आजच्या तरूणांनी स्वामी विवेकानंद यांना आदर्श ठेवावा. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आजच्या भारतीय तरूणांमध्ये आहे.मन, मनगट व मेंदू यांचा विकास म्हणजे शिक्षण होय.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी राष्ट्रीय युवा चेतना दिन साजरा करण्यामागचे महत्त्व विशद केले. विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. पुढे त्या म्हणाल्या,” विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांच्यातील अभ्यासूवृत्ती वाढवण्यासाठी वाचन वाढवा.”
प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मीनाताईंचा परिचय करून दिला तर पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी यांनी मीनाताईंचे स्वागत केले. माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
व्याख्यानासाठी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या सहायक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

https://photos.app.goo.gl/ktvhLymUoEL1EWzt5

Leave a Comment