वार्षिक स्नेहसंमेलन

*फडके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पनवेलकरांसमोर साकारला शिवकाळ*
पनवेल, दि. १५ डिसेंबर २३. पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत तसेच विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वी पासून ते शिवराज्याभिषेक सोहळा पर्यंत सर्व घटनांवर नृत्य, नाट्य, पोवाडा, भारूड, गोंधळ या वैविध्यपूर्ण प्रकारातून सादरीकरण केले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून चांगू काना ठाकूर महाविद्यालय नवीन पनवेल (स्वायत्त) येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. रत्नप्रभा धर्माजी म्हात्रे या उपस्थित होत्या. “श्रीशिवछत्रपती यांचे कार्य पुढील पिढीला समजण्यासाठी विद्यालयाने स्नेहसंमेलनासाठी उत्तम विषयाची निवड केली आहे. आज शिवराय असते तर.. त्यांना या बालमावळ्यांचे विशेष कौतुक वाटले असते. मराठी माध्यमाची उत्तम शाळा म्हणून फडके विद्यालयाने पनवेल परिसरात आपला नावलौकिक जपला आहे.” उपस्थितांशी संवाद साधताना मा.डाॅ. म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या प्रास्ताविकात माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी उपस्थितांचे स्वागत करून विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पालक विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. पुढे त्या म्हणाल्या,”२५ वर्षे विद्यालयाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदानाचे अविरत कार्य सुरू ठेवले आहे आणि यापुढेही विद्यालय उत्तम कार्यासाठी कटीबद्ध आहे.” प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन व प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे उपस्थित होत्या.
व्यासपीठावर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इंद्रधनू या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सहाय्यक शिक्षिका स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/NQZmHve8xWpf5j1p7

Leave a Comment