“Marathi Language Pride Day: Glory of Marathi, Pride of Culture”

मराठी भाषा गौरव दिन: मराठीचा गौरव, संस्कृतीचा अभिमान

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!”
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व शिक्षकांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका रेखा भावसार यांनी सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी तयार केलेले शुभेच्छापत्र सर्व शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देऊन मराठी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी दिन का साजरा करतो, मराठी भाषेचा इतिहास, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला आणि दैनंदिन जीवनातील मराठीचे महत्त्व याबद्दल माहितीपूर्ण सादरीकरण केले. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीचा आणि संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथेचा समृद्ध वारसा लाभला आहे. या संतपरंपरेची ओळख करून देणारी सुंदर प्रदर्शनीही आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता तसेच प्रसिद्ध कवींच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
मराठी दिनानिमित्त पर्यावरण विषयावर घोषवाक्य स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. काव्यवाचन स्पर्धेची प्रथम फेरी इयत्तानिहाय झाली व त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी मराठी दिनी पार पडली. या स्पर्धेचे परीक्षण सहाय्यक शिक्षिका वैभवी मराळ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका रेखा भावसार होत्या, तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका अनुपमा जगताप यांनी उत्तमरीत्या केले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. एकूणच मराठी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे मराठी साहित्यिक व त्यांच्या साहित्याविषयीचे ज्ञान अधिक समृद्ध झाले.

This will close in 20 seconds

Scroll to Top