म. ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय ,नवीन पनवेल.
गणित उपक्रम
दिनांक ९/७/२०२६ गुरुवार रोजी गणित विषयाचा सत्र १ मधील उपक्रम घेण्यात आला.
NEP मध्ये प्रत्येक विषयामधील भारतीय ज्ञान परंपरेचे योगदान विद्यार्थ्यांना आवर्जून माहिती करून देण्याबाबत सुचवले आहे.
हेच लक्षात घेऊन या उपक्रमामध्ये भारत ज्ञान परंपरेतील गणित विषयातील योगदान अंतर्गत वैदिक गणिताची ओळख करून देण्यासाठी काही व्हिडिओज इयत्ता ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना पाठवलेले होते.
इयत्ता ५वी ते ७वी च्या वर्गात व्हिडिओ पाठवलेली सूत्र ,क्लृप्त्या, आदल्या दिवशीच्या गणित तासिकांना समजावून दिली.त्यावर आधारित उदाहरणे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतली.आणि विद्यार्थांचे गट करून गटप्रमुख नेमून सर्वांना पुन्हा घरी सराव करण्यास सांगितले व दिनांक ९/७/२०२६ गुरुवार रोजी गणित तासिके अंतर्गत गटनिहाय कृतीयुक्त गणिते विद्यार्थ्यांना फळ्यावर सोडविण्यास दिली त्यात ज्या गटाच्या विद्यार्थ्यांनी कमी वेळेत व अचूक उदाहरण सोडविलेले असेल त्या गटाला गुणदान केले.
अशाप्रकारे सर्व घटकावर आधारित उदाहरणे गटनिहाय सोडविण्यास दिली.व अधिक गुण प्राप्त करणारा त्या-त्या वर्गातील गटला विजेता म्हणून घोषित केले .यात दोन अंकी संख्येचा पाढा तयार करणे, एखाद्या संख्येला कमी वेळेत ९ व ११ ने भागणे,बेरीज, वजाबाकी,वर्ग करणे यासारख्या कृती समाविष्ट होत्या.
यातून विद्यार्थ्यामध्ये सहकार्य, सहयोग,कृतीचा वेग वाढविणे ,स्पर्धा विचारकौशल्य , जिंकलेल्या साठी अभिनंदन टाळीने कौतुक करणे,(हार स्वीकारून दुस-याचे कौतुक करणे). आपल्या गटातील सहअध्यायीस प्रोत्साहन देणे.या सारख्या गुणांचा विकास करण्यास मदत झाली . सर्व मुले यात उत्साहाने सहभागी होऊन कृती करत होती . मित्राला चियरअप करत होती
इयत्ता ८वी ते १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन अंतर्गत हे व्हिडिओज अभ्यासून वर्गात काही विद्यार्थ्यांनी विषयमित्र होऊन वर्ग करणे ,वर्गमूळ काढणे, घनमूळ काढणे या पद्धतींचे स्पष्टीकरण देऊन फळ्यावर उदाहरणे सोडविली. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न तयार करून आणले होते ते फळ्यावर लिहिले व इतर विद्यार्थ्यांनी गटामध्ये चर्चा करून सोडवले.यातून विद्यार्थ्यांवर स्वयंअध्ययन, सहाध्यायीस सहकार्य, प्रश्न तयार करण्याचे कौशल्य,तर्कसंगत विचार करणे ह्या घटकांच्या संस्कार होण्यासही मदत झाली.
अशा प्रकारे गणित विषयांतर्गत ‘वैदिक गणित ओळख’ हा उपक्रम छान रितीने पूर्ण झाला.


