माध्यमिक विभाग – मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम
* वेळापत्रक तयार करा, यशावर लक्ष केंद्रीत करा !*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शनिवार दि. ११ जुलै २०२६ रोजी आयोजित गुणगौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित म. ए. सो. ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण मॅडम या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, “फडके विद्यालयातील २६ वर्षांचा माझा प्रवास खूपच छान होता. १०० % निकालाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी जे प्रयत्न केले त्याचे आज हे फलित आहे. शाळेवर पूर्ण विश्वास ठेवा. विद्यालयातील शिक्षक तज्ज्ञ आहेत. विद्यार्थ्यांनी वेळापत्रकावर लक्ष द्या. यशावर लक्ष केंद्रीत करा. एकाग्र व्हा. स्वतःच्या क्षमता जाणून प्रामाणिक प्रयत्न करा.”
अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध उद्योजक, म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे आजीव सदस्य व शालासमितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर सर म्हणाले, ” विद्यालयीन यशानंतर भविष्यात कोणता पर्याय निवडावा याबाबत विद्यार्थी, पालक यांनी अतिशय डोळस असावं. अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आजच्या काळात कौशल्याधिष्ठीत ज्ञानाची आवश्यकता आहे. याचा विचार करून विद्यालयाने विद्यार्थ्यांना सक्षम करावे. सुशिक्षित विद्यार्थी तर विद्यालयात घडतात परंतु ते सुसंस्कारित असावेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आई वडिलांचा आदर, दैवी शक्ती पुढे नतमस्तक होणे हे वैयक्तिक संस्कार तर आपण रूजवू परंतु सामाजिक संस्कार फार महत्त्वाचे आहेत. यातूनच राष्ट्र चारित्र्य घडणार आहे.” जपान सारख्या प्रगत देशाची राष्ट्रसंस्कृती स्पष्ट करून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून आदर्श वर्तनाची अपेक्षा व्यक्त केली.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालकांनी देखील फडके विद्यालयाबाबत ऋण व्यक्त केले. देवी शारदा व मएसो च्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या गानवृंदाने ईशस्तवन, स्वागतगीत व ध्येयगीत सादर केले.यावेळी व्यासपीठावर, माध्यमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रचना पाटील मॅडम , माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन मॅडम व प्राथमिक विभाग – मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे मॅडम , प्राथमिक विभाग – इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे मॅडम , पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नमिता जोशी मॅडम उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात बोलताना मुख्याध्यापिका रचना पाटील मॅडम म्हणाल्या, ” फडके विद्यालयातून बाहेर पडणाऱ्या मराठी माध्यमाच्या २४ व्या बॅच चा निकाल १००% लागला याचा विशेष अभिमान आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे यश हे त्यांचे एकट्याचे नसून त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ध्येयगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ .मनिषा महाजन मॅडम यांनी आभार मानले. मराठी माध्यमातील सहाय्यक शिक्षिका स्वाती बापट मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



























