गुणगौरव सोहळा
(माध्यमिक विभाग – मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम)
विचार करा, अभिव्यक्त व्हा , संवाद साधा, समृद्ध व्हा
!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी आयोजित गुणगौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. समिधा गांधी या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या,”जे अभ्यासक्रम भविष्यात देशाला प्रगतीपथावर नेतील त्यांची निवड करा. अधिकाधिक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावनांकडे लक्ष ठेवा. सुसंवादाचे कौशल्य संपादन करा. व्यसनांपासून दूर राहून ध्येयावर एकाग्र व्हा. स्वतःच्या क्षमता जाणून प्रामाणिक प्रयत्न करा. देशसेवा हे आपले अंतिम ध्येय असावे.”
मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पालकांनी देखील फडके विद्यालयाबाबत ऋण व्यक्त केले.
देवी शारदा व मएसो च्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या गानवृंदाने ईशस्तवन, स्वागतगीत व ध्येयगीत सादर केले.
यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन व प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात बोलताना मुख्याध्यापिका समिता सोमण म्हणाल्या, ” फडके विद्यालयातून बाहेर जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावा हा प्रयत्न शाळा स्तरावरून होत असतो. यशस्वी विद्यार्थ्यांचे यश हे अथक परिश्रमाचे फलित आहे.” विद्यालयातील उपक्रमांची माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
म ए सो गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी माध्यमातील सहाय्यक शिक्षिका स्वाती बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


