माजी विद्यार्थी मेळावा

म.ए. सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल.(माध्यमिक विभाग-मराठी माध्यम)

“कोणत्याही क्षेत्रात कार्य करत असाल तर प्रामाणिकपणा जपा”*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे मा. विजयसिंह परदेशी बोलत होते.
रविवार दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी विद्यालयाच्या क्रीडांगणावर शैक्षणिक वर्ष २००३ ते २०२३ पर्यंत च्या बॅचेस चा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात वर्ग एक पदावर कार्यरत अधिकारी व विद्यालयाचे माजी शिक्षक मा. विजयसिंह परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतातून ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सचोटीने काम करावे.‌ आपल्या निष्ठा जपाव्यात.” तसेच त्यांनी विद्यालयाला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी, शिक्षक यांचा विद्यालय विकासातील सहभाग अधोरेखित केला. पुढे त्या म्हणाल्या, ” विद्यालयाने २५ वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार पाहिले, पण खंबीरपणे तोंड दिले. आज माजी विद्यार्थ्यांना बहुसंख्येने उपस्थित पाहून खूप आनंद झाला. हा अनुबंध अधिक दृढ होत जाईल.”
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या आजीव सदस्या मा. प्रणिती जोगळेकर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाशी अनुबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले. विद्यालयाचे माजी महामात्र मा. विनायक शुक्ल यांनी उपस्थितांना रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व फडके विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी दातृत्वाचा एक नवा आयाम निर्माण करावा , असे आवाहनही केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात म ए सो चे आजीव सदस्य व विद्यालयाचे महामात्र मा. डॉ. आनंद लेले यांनी आपल्या ओघवत्या , खुमासदार शैलीत माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” माजी विद्यार्थी मेळावा हा आपल्या शालेय मित्रमैत्रिणींना भेटण्याची सुवर्णसंधी असते. आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेच्या गरजा अश्या मेळाव्यांमधून लक्षात येतात आणि मग आपण यथाशक्ती आर्थिक सहाय्य करणे हा आपला कर्तव्याचा भाग आहे.”
याप्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे उपस्थित होत्या.
बहुसंख्येने माजी विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या सहायक शिक्षिका, प्रीती धोपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/cUY6ktVie3AcMg8X6

Leave a Comment