दिनांक : १७ जुलै २०२३
प्राथमिक मराठी
ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळून आपल्या आसपासचा अंधकारमय परिसर प्रकाशमान करतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अज्ञानरूपी अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी विद्यालयात दीपपूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . विद्यार्थ्यांना पूर्व सूचना दिल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वतःचे दिवे सजवून आणले. आपल्या विद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने रौप्य महोत्सवीरुपी दिव्यांची आरास तयार करण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी सर्व दिवे प्रज्वलित केले. दिवे प्रज्वलित करीत असताना सर्व विद्यार्थ्यांनी शुभंकरोती म्हणत दिव्यांना नमन केले सर्व विद्यार्थ्यांनी सर्व दिव्यांचे दर्शन घेतले . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिव्याचे महत्त्व सांगितले तसेच प्राचीन काळापासून दिव्यांमध्ये आलेले बदल हे देखील सांगितले. दीप पूजनानिमित्त विद्यार्थ्यांची श्लोक पठण स्पर्धा घेण्यात आली. यात सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला होता. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.
पूर्व प्राथमिक
आपल्या हिंदू संस्कृतीत दिव्याला फार महत्त्व आहे. दिव्याची पूजा शुभ मानली जाते. दीप अमावस्येचे महत्त्व सगळ्यांना समजावे यासाठी आमच्या विद्यालयात दि.१७/०७/२०२3 रोजी ‘ दीप पूजन प्रकल्प ‘ घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे दिवे आणून शोभा वाढवली. एका टेबलावर पानांची सजावट केली, त्यावर दिवे मांडले, तेल वाती घालून, दिवे प्रज्वलित केले, फलक सुशोभित केले. तसेच मा.मुख्याध्यापिका श्रीमती जोशी मॅडम सह वर्ग शिक्षकांनी दिव्यांची पूजा केली. त्या विविध प्रकारच्या दिव्यांची ज्योती एकाच वेळी प्रज्वलित झाल्यामुळे त्यांचा झगमगाट अत्यंत नेत्रदीपक वाटला.