बाल मेळावा

*फडके विद्यालयात बालमेळाव्याचे आयोजन*
नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये शनिवार,दि.१६ मार्च २०२४ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘माझी ताई निवेदिता’ या सुप्रसिध्द मालिकेतील बाल कलाकार असीम उर्फ रुद्रांश चोंडेकर व अनया पिंगळे यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
या मेळाव्यात शाळेतील इंग्रजी व मराठी माध्यमातील इ.५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे विक्री केंद्र उभारली होती. उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकांना पदार्थ विकत घेऊन मनसोक्त आनंद लुटला. स्टाँलवरील पदार्थ विक्री, जाहिरात, सादरीकरण याबाबत चा नाविन्यपूर्ण आगळावेगळा अनुभव घेतांना विद्यार्थ्यांना वेगळी अनुभूती अनुभवायला आली. पाणीपुरी, भेळ, भजी , शिरा, ठेचा भाकर, पोहे, उसळ,चाँकलेट, चायनीज पदार्थ, पावभाजी, वडापाव , पिझ्झा, केक असे वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले होते. आपण केलेले पदार्थ विकताना त्यांना वेगळाच आनंद मिळत होता, ग्रीटिंग कार्ड, कीचेन, बुकमार्क विविध वस्तू तसेच मेहंदी, नेल आर्ट टॅटू यासारख्या कलांचाही या मेळाव्यात समावेश होता. इंग्रजी माध्यमाचे ४० स्टाॅल्स व मराठी माध्यमाचे ४० स्टाॅल्स याठिकाणी मांडण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहार तसेच स्वतः केलेल्या कामाचा आनंद प्रत्यक्ष व सहज घेता आला. काही अनुभव हे पुस्तकांपेक्षा प्रात्यक्षिकातून उत्कृष्ट रितीने दिले जातात, त्यातील हा आनंद मेळावा हे उत्कृष्ट उदाहरण होय.
उपस्थित बालकलाकार रूद्रांश चोंडेकर व अनया पिंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मालिकेपर्यंतचा आपल्या प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. खास आग्रहास्तव मालिकेतील एक छोटा प्रसंगही दोघांनी सादर केला.
याप्रसंगी फडके विद्यालयाच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी विद्यालयाच्या या जीवन व्यवहार समृद्ध करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले . ‘विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रूजवण्यासाठी व स्वकमाईची जाणीव होण्यासह‎ या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध व्यवसाय व प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी हा आनंदमेळावा आयोजित केला असल्याचे प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी बालकलाकारांचा परिचय करून दिला. प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शितल साळुंखे यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बालमेळाव्याच्या यशस्वी आयोजन नियोजनात सहभागी सर्वांचे आभार मानले . सहाय्यक शिक्षिका सायली लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/oe5JA6mt53yj3ova6

Leave a Comment