युवा चेतना दिन २०२३

*‘युवांमधील नवचेतनेचा जागर’*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त गुरूवार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी म ए सो च्या नवी मुंबईतील तीनही शाळांमधील विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील , फ्लाॅवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. बुद्धीप्रामाण्यवाद, अमोघ वक्तृत्व, जग कल्याणाचा विचार, कुशाग्र बुद्धी, सहसंवेदना हे गुण नरेंद्र ला स्वामी विवेकानंद बनवतात. ,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेज चे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे  यांनी केले. स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून मा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. पुढे बोलताना ते म्हणाले, “स्वामीजींमधील गुणांना डोळ्यासमोर ठेवून उद्याचे स्वामीजी घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”   महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
 राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या व्यासपीठावरून बोलताना ते म्हणाले, ‘ स्वतः च्या स्वप्नांचा पाठलाग करा. ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना विशेष आनंद होत आहे.’
या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर , ॲड. सागर नेवसे , डाॅ, संतोष देशपांडे,  मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र  मा. सुधीर भोसले,  संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते. तसेच नवी मुंबईतील शाळांचे शाखाप्रमुख, म ए सो चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी , पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर  आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ” स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता.‌ ते एक संन्यासी योद्धा, युगनायक होते.”  स्वामी विवेकानंदांच्या विचारांबाबत बोलताना मा. भिशीकर यांनी स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व  युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म ए सो ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात.  त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचे काम होत आहे, असा हेतू स्पष्ट केला.
रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी केले.
संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा डॉ संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 म ए सो पब्लिक स्कूल कळंबोली येथील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.

 

 

https://photos.app.goo.gl/GRwPasVMuiTc6n8o7

Leave a Comment