आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक म्हणून घडणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बंधुभाव निर्माण होणे व निसर्गाप्रती प्रेम असणे अधिक गरजेचे आहे.
जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करणारे आपले पोलीस बांधवांना राखी बांधण्यासाठी विद्यालयातर्फे प्राथमिक विभागाच्या प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थ्यांनी खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन सर्व पोलीस बांधवांना व भगिनींना राखी बांधली तसेच गुलाब पुष्प व मिठाई देऊन वातावरण आनंदी करण्यात आले. इयत्ता चौथीच्या कुमारी अबोली चिकणे या विद्यार्थिनीने पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे भाष्य केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे सुसंवाद साधला. वाईट गोष्टींपासून कसे दूर राहावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ दिला.
शाळेच्या सुरक्षित सुरक्षिततेची जबाबदारी असणारे आपले शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणारे व्हॅनवाले काकांनाही विद्यालयाच्या सभागृहात आमंत्रित करून राखी बांधण्यात आली. सर्व काकांनी विद्यालयाप्रती आभार व्यक्त केले. व्हॅनवाले काकांनीही विद्यार्थ्यांना पौष्टिक असा खाऊ दिला.
निसर्ग हा मानवाचा अविभाज्य घटक आहे. निसर्ग आपल्याला कायम काही ना काही देतच असतो. अशा निसर्गप्रती बंधुभाव दृढ करण्यासाठी विद्यालयातर्फे प्रकृतीवंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधींनी राखी बांधून निसर्गाशी आपले नाते घट्ट केले. तसेच मुख्याध्यापिका सौ.निशा देवरे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या स्वतःच्या घरी असलेल्या झाडांना बांधण्याचे आवाहन केले व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण करण्यासाठी ‘मुष्टी धान्य उपक्रमाचे’ आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवाहन केल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी तांदूळ हे धान्य एकत्रित करून हे धान्य चिंचवली येथील अनाथ आश्रमास देण्यात आले.
प्रत्येक वर्गांमध्ये बंधूभाव प्रेम निर्माण करण्यासाठी वर्गनिहाय रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून पूजन केले. अशा प्रकारे आनंदमय वातावरणात पंचारतीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.