विद्यालयाचे रोप्य महोत्सवी वर्ष- शुभारंभ सोहळा

*आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करताना आखलेल्या ध्येयधोरणांनुसार ही शाळा वाटचाल करीत आहे हे पाहून अत्यंत अभिमान वाटला.*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी विद्यालयाच्या कै. पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात म ए सो च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा मा. आनंदी पाटील यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगतातून आपले विचार व्यक्त केले.
” महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाखांप्रमाणे फडके विद्यालयात देखील विद्यार्थी विकासाचे कार्य उत्तमपणे सुरू असल्याचा आनंद झाला. विद्यालयाच्या या विकास कार्यात संस्थेच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल .” असे आश्वासन देखील मा. आनंदी पाटील यांना यावेळी व्यासपीठावरून बोलताना दिले.
या सोहळ्याला विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. सनोफी हेल्थकेअर येथे सिनिअर सायंटिफिक राईटर या पदावर कार्यरत, डॉ. मानसी कुलकर्णी -दाते व मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारी ॲड. मृण्मयी खांबेटे या प्रमुख पाहुण्या होत्या. आपल्या मनोगतात मानसी हिने आपण मराठी माध्यमात शिकलो असल्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच संशोधन कार्यात कधीही भाषेचा अडसर आला नसल्याचेही नमूद केले. ॲड, मृण्मयी हिने उपस्थित विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने भविष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरीत केले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या शालासमितीचे अध्यक्ष देवदत्त भिशीकर, शालासमिती सदस्य गोविंद कुलकर्णी, माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, प्राथमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
“१८६० साली सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा ज्ञानविस्तार या विद्यालयाच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात उत्तमपणे होत आहे. विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध विद्यालयाशी अधिक दृढ होतील यासाठी विद्यालयाने प्रयत्न करावेत.” असे आवाहन उपस्थितांशी संवाद साधताना मा. देवदत्त भिशीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संवाद साधताना मा. गोविंद कुलकर्णी म्हणाले, ” २५ वर्षांपूर्वी शाळेने सुरू केलेला हा प्रवास नक्कीच अनेक अनुभवांनी समृद्ध आहे. असंख्य लोकांचे यात योगदान आहे. भविष्यातही हे ज्ञानदानाचे कार्य अधिक उत्तमतेने सुरू राहील.”
या सोहळ्यात विद्यालयाचे ध्येय अधोरेखित करणाऱ्या लोगो चे प्रकाशन करण्यात आले. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून मुष्टीधान्य उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी संकलित केलेले १५०० किलो तांदूळ वनवासी कल्याण आश्रमाला भेट देण्यात आले.
विद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयाचे हितचिंतक, स्नेही, पालक , माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

https://photos.app.goo.gl/oZk8dPLN6qf7sNEYA

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’