आषाढी एकादशी सोहळा
दिनांक: २४/६/२०२६
विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, भक्तीभाव, सांस्कृतिक मूल्ये व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे उद्दिष्टाने शाळेत आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आपण भारतीय असल्याचा अभिमान असणे आणि तो मनात रुजणे हे आपल्या शालेय शिक्षणातील एक मूलभूत वैशिष्ट्य असल्याने अशा सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांवर संस्कार घडवले जातात.
सकाळच्या सत्रात शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामस्मरणात तल्लीन होऊन गोल फेर धरला आणि बालवारकऱ्यांच्या रुपात सुंदर नृत्य केले.
दुपारच्या सत्रात सभागृहात पालकांसाठी विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका आणि पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती पूजनाने व मुख्याध्यापिका मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. म्हात्रे मॅडम यांनी पालकांना तुळशीचे पारंपरिक व वैज्ञानिक महत्त्व समजावून सांगितले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले. सभागृहात पालकांनीही अत्यंत उत्साहाने रिंगण धरून फुगड्यांचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तुळशीच्या रोपांचे पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व समजावून सांगत तुळशीच्या रोपांची विक्री केली, ज्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रकारे भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.









